'सरकारला नागरिकांसाठी वेळ नाही, ते घाणेरड्या राजकारणात व्यस्त'; आदित्य ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:23 PM2023-10-26T17:23:59+5:302023-10-26T17:30:00+5:30
माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे.
नवी मुंबईमेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी मेट्रोचे उद्घाटनाचे नियोजन होते. त्यानुसार संबंधित यंत्रणा कामालाही लागल्या होत्या. परंतु, पंतप्रधानांचा नियोजित दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटन आता पुढे ढकलले आहे.
विशेष म्हणजे उद्घाटनाच्या तारखा चार वेळा पुढे ढकलण्यात आल्याने गेल्या महिनाभरापासून तयारीत व्यस्त असणारे संबंधित विभागाचे अधिकारी हवालदिल झाले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची नवीन तारीख स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे मेट्रोचे उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलले गेल्याची चर्चा सिडकोत सुरू आहे. सदर प्रकरणावर विरोधकांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. सुमारे चार महिन्यांपासून नवी मुंबई मेट्रो उद्घाटनासाठी सज्ज आहे. पण खोके सरकारला सामान्य नागरिकांसाठी वेळ नसून, घाणेरड्या राजकारणात ते व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. तसेच सार्वजनिक सेवेसाठी महत्वाचं असलेलं उद्घाटन असं रखडत ठेवणं योग्य आहे का?,असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. सरकारकडे लोकांसाठी आणि सार्वजनिक सेवांसाठी वेळ नसेल, तर कुठल्याही सोहळ्यासाठी न थांबता त्या सुविधा लोकांसाठी तातडीने खुल्या करायला हव्यात, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
सुमारे चार महिन्यांपासून नवी मुंबई मेट्रो उद्घाटनासाठी सज्ज आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 26, 2023
पण खोके सरकारला सामान्य नागरिकांसाठी वेळ नसून, घाणेरड्या राजकारणात ते व्यस्त आहेत.
सार्वजनिक सेवेसाठी महत्वाचं असलेलं उद्घाटन असं रखडत ठेवणं योग्य आहे का?
सरकारकडे लोकांसाठी आणि सार्वजनिक सेवांसाठी वेळ नसेल, तर…
दरम्यान, नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह राज्यातील एक लाख महिलांचा भव्य मेळावा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर नियोजित केला होता. त्यासाठी मोदी उपस्थित राहणार होते. उद्घाटनाच्या तारखा तीन वेळा पुढे ढकलल्यानंतर ३० ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करून त्यानुसार सिडकोने युद्धपातळीवर तयारी सुरू केली होती. कार्यक्रमासाठी भव्य वातानुकूलित मंडप, पार्किंग आणि स्वच्छतागृहांच्या सुविधांचा आराखडा तयार करून त्यावर पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून सिडकोने निविदाही मागविल्या आहेत. परंतु पंतप्रधानांचा नियोजित दौराच रद्द झाल्याचा संदेश सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने राज्य शासनाच्या संबंधित विभागाला प्राप्त धाडला. मेट्रोचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.