जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी
By योगेश पिंगळे | Published: September 2, 2023 04:43 PM2023-09-02T16:43:36+5:302023-09-02T16:44:38+5:30
Navi Mumbai: जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यासाठी जालना येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा निषेध म्हणून माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबईतील मराठा समाजाने शनिवारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
मराठा समाजच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यानी जालना येथे आंदोलन सुरु केले होते. पाटील यांची प्रकृती बिघडत होती मात्र ते निर्णयावर ठाम होते. पोलीस यंत्रणा हे आंदोलन शांतपणे हाताळू शकले असते परंतु पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कोणीतरी कट कारस्थान करून वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. गृहमंत्री फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई कारवाई तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पाटील यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हि मागणी रास्त असून सुप्रीम कोर्टातून आरक्षण आणण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस प्रशासन, जालना जिल्हाधिकारी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष बर्गे, माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पोपटराव देशमुख, भाजप युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्त घंगाळे, संतोष कोंढाळकर, जितू येवले, श्याम ढमाले, योगेश बर्गे, विजय पाटील, अरुण पवार, दिनकर सणस, सोमनाथ काटे, कृष्णा पाटील, बाजीराव धोंडे आदी उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश कदम यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबई आणि स्वराज्य पक्ष नवी मुंबई यांच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आंदोलकांवर जालना येथे झालेल्या हल्याचा निषेध करण्यात आला.