नवी मुंबई : महानगरपालिकेच्या विविध विभागात तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना महापालिकेने २००७ साली स्वीकारलेल्या धोरणानुसार “समान काम समान वेतन” लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मागील काही महिन्यांपासून नगरविकास कार्यालयात प्रलंबित आहे. महापालिकेतील कामगारांना समान काम समान वेतन लागू करून त्वरित वेतनवाढ देण्यात यावी. तसेच याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांना द्यावेत, या मागणीसाठी समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून गुरुवारपासून मुंबईतील आझाद मैदान येथे साखळी उपोषण सुरू आहे.
महापालिकेच्या विविध विभागात मागील अनेक वर्षांपासून कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या माध्यमातून कोणत्याही आवश्यक सुविधादेखील दिल्या जात नसून तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा उदरर्निवाह करणे जिकिरीचे झाले आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि महापालिकेने स्वीकारलेल्या समान काम समान वेतन या हक्काच्या धोरणाचा लाभ मिळावा, यासाठी समाज समता कामगार संघाचे मंगेश लाड आणि गजानन भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. या उपोषणात नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.