दहाव्या दिवशी नैना प्रकल्पग्रस्तांचं उपोषण स्थगित, पुढील काळात नैना विरोधी लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार
By वैभव गायकर | Published: December 15, 2023 07:30 PM2023-12-15T19:30:58+5:302023-12-15T19:31:11+5:30
यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणुन प्रांत अधिकारी राहुल मुंडके यावेळी उपस्थित होते.
पनवेल:मागील दहा दिवसांपासून सुरु असलेला नैना प्रकल्पाविरोधात बेमुदत उपोषण आंदोलन दि.15 रोजी स्थगित करण्यात आला.माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना नारळपाणी देऊन उपोषण स्थगित करण्यात आला.
यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणुन प्रांत अधिकारी राहुल मुंडके यावेळी उपस्थित होते. दहा दिवसात पहिल्या टप्प्यात सहा जण उपोषणाला बसले होते.यामध्ये अनिल ढवळे,दमयंती भगत,जयराम कडू,मधुकर पाटील,समीर पारधी,रवींद्र गायकर,यांचा समावेश होता.आठव्या दिवशी या उपोषणकर्त्यामध्ये आणखी सहा जणांनी उपोषणात सहभाग घेतला.यामध्ये सुजित पाटील,रुपेश मुंबईकर,नरेश भगत,कमलाकर भगत,शालिनी ठाणगे,जान्हवी ठाकुर आदींचा समावेश होता.या उपोषणादरम्यान वेगवगेळ्या आंदोलन प्रकल्पग्रस्तांच्या वतीने छेडण्यात आले.यामध्ये उपोषणस्थळी तुरमाळे गावाजवळ मुंबई गोवा महामार्ग चक्का जाम करण्यात आला.उपोषणकर्त्यांच्या मागणीबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी बैठक देखील आयोजित केली होती.मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
दरम्यान हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी नैना प्रकल्पावर सविस्तर चर्चा घडवून आणली.नैना प्रकल्प कसा शेतकरी विरोधी आहे.याबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडत शासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.शेकाप आमदार जयंत पाटील यांनी देखील याबाबत स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका ठाम पणे मांडली.
दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याने शुक्रवार दि.15 रोजी नेत्यांच्या आग्रहास्तव उपोषण सोडले.माजी केंद्रिय मंत्री अनंत गीते,माजी आमदार बाळाराम पाटील,माजी आमदार मनोहर भोईर,ऍडव्होकेट सुरेश ठाकुर,जे एम म्हात्रे,सुदाम पाटील,शिरीष घरत,बबन पाटील,प्रशांत पाटील,आर सी घरत आदींसह महविकास आघाडीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या विविध प्रतिनिधींमार्फत नैना बाबत आश्वासने देण्यात आली आहेत.काही दिवस वाट पाहणार आहोत.शासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र असणार असल्याची माहिती उपोषणकर्ते अनिल ढवळे यांनी दिली.