नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: येथील पाम बीच मार्गावर सीआरझेडचे उल्लंघन करून पाणथळच्या जागेवर करण्यात येत असलेल्या बांधकामाच्या पाहणीसाठी सोमवारी मँग्रोव्ह सेल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा आयोजिला होता. मात्र, या दौऱ्याप्रसंगी या बांधकामाविषयी तक्रार करणारे मूळ तक्रारदार सुनील अगरवाल यांना विकासकाच्या प्रतिनिधीने मज्जाव केल्याने बांधकाम साईटची पाहणी न करताच शासकीय अधिकाऱ्यांवर हात हलवत परतावे लागण्याची नामुष्की ओढवली.
पाम बीच मार्गावर नेरूळ येथे गोल्फ कोर्ससह इतर बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामास सुनील अगरवाल यांच्यासह शहरातील इतर पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सीआरझेडचे मोठे उल्लंघन होत असून, खारफुटीसही धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. याविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हरकत घेतली आहे. बांधकामाच्या विरोधात कोकण विभागीय पाणथळ समितीकडे सुनील अगरवाल यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत.
यानंतर कोकण आयुक्तांनी मँग्रोव्ह सेल आणि सिडको व वनविभागाचे अधिकारी यांना संयुक्त पाहणी दौरा करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात आदेश देऊनही ही पाहणी होत नव्हती. अखेर आपण वारंवार पाठपुरावा केल्याने सोमवारी मँग्रोव्ह सेलचे विभागीय अधिकारी सुधीर मांजरे आणि वनविभागाचे अधिकारी विकास बैरागी यांनी संयुक्त पाहणी दौरा आयोजिला होता. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे या पाहणीप्रसंगी दांडी मारली. मात्र, या पाहणी दौऱ्यात विकासक मिस्त्री कन्स्ट्रक्शनसच्या प्रतिनिधींनी मूळ तक्रारदार सुनील अगरवाल यांना घटनास्थळी प्रवेश करण्यास मज्जाव केला. यामुळे तेथे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तर मूळ तक्रारदारच पाहणीप्रसंगी नसल्याने तेथे आलेले मँग्रोव्ह सेलचे विभागीय अधिकारी सुधीर मांजरे आणि वनविभागाचे अधिकारी विकास बैरागी यांचा पुरता हिरमोड झाला. यामुळे त्यांना बांधकाम साईटची पाहणी न करताच परतावे लागले. यामुळे याचे पडसाद आता कोकण विभागीय पाणथळ समितीच्या पुढील बैठकीत उमटण्याची शक्यता आहे..........पाणीथळ आणि खारफुटीवर सीआरझेडचे उल्लंघन करून करण्यात येणाऱ्या या बांधकामास माझी हरकत आहे. तशी तक्रार मी संबंधित विभागाकडे केली आहे. माझ्या तक्रारीनुसारच मँग्रोव्ह सेल आणि वनविभागाचे अधिकारी पाहणीस आले होते. सिडकोच्या प्रतिनिधींनी दांडी मारली होती. मात्र, विकासकाच्या प्रतिनिधींनी मला साईटच्या पाहणीसाठी प्रवेश देण्यास मज्जाव केला. यामुळे मी दाद मागणार आहे.- सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी............कोकण विभागीय पाणथळ समितीच्या आदेशानुसार आम्ही पाहणीस गेलो होतो. मात्र, विकासकाच्या प्रतिनिधीने मूळ तक्रारदारास प्रवेश नाकारला. तक्रारदारच पाहणी दौऱ्यात नसल्यावर ती करणे योग्य नव्हते. यामुळे पाणथळवर सीआरझेडचे उल्लंघन करून होत असलेल्या कथित बांधकामाची पाहणी आम्हाला करताच आली नाही.- विकास बैरागी, वनअधिकारी, वाशी विभाग.