नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाचे मुख्यमंत्र्यांसमोर झाले अंतरिम सादरीकरण
By नारायण जाधव | Published: February 6, 2024 04:44 PM2024-02-06T16:44:20+5:302024-02-06T16:45:04+5:30
आज नवी मुंबईत महाराष्ट्र भवन व्हावे, या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप प्राप्त झाले
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आज नवी मुंबईत महाराष्ट्र भवन व्हावे, या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला खऱ्या अर्थाने मुहर्तस्वरूप प्राप्त झाले आहे. सोमवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठकीत नवी मुंबईमधील वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे भव्यदिव्य वास्तूचे अंतरीम सादरीकरण करण्यात आले, अशी माहिती यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.
महाराष्ट्र भवनाची वास्तू कशी असेल ते मी आज प्रत्यक्ष पाहून माझ्या जीवनातला आनंद मावेनासा झाला आहे. महाराष्ट्र भवनाची वास्तू 14 मजली असून त्याचबरोबर अशा या सुंदर महाराष्ट्र भवनामध्ये अभ्यागतांसाठी स्वागत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, भोजन कक्ष, प्रीफेशनल एरीया, बंक्वेट हॉल, सूट रूम, ज्यूस कॅफ, टी- कॅफ, कॉफी-कॅफ, बैठक कक्ष, ई-लायब्री, कॉनफरंन्स हॉल, फूड प्लाझा विश्रांती कक्ष, व्ही.आय.पी. रूम तसेच लोकप्रतिनिधीं सोबत येणारे त्यांचे सारथी, सहकारी, वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही विश्रांती रूम असणार आहेत. त्याचबरोबर अशा अनेक विविध प्रकारच्या सुसज्ज सुख-सुविधांची रेलचेल या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत. तसेच महाराष्ट्र भवनाचे प्रथम दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे अशी प्रथमच वास्तू महाराष्ट्रामध्ये उभी राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी वर्ग यांचे म्हात्रे यांनी आभार मानले. नवी मुंबई शहर वसवितांना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र जागा नसल्याने व हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या महाराष्ट्र भवनासाठी सन 2014 पासून माझा जो लढा चालला होता त्याला आज पूर्णपणे पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.