कोकणचा राजा आला रे! एपीएमसीत ११ हजार हापूस पेट्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:25 AM2023-02-28T10:25:30+5:302023-02-28T10:25:41+5:30
आंब्याचा सुगंध दरवळू लागला : व्यापाऱ्यांत उत्साह
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी कोकणचा हापूस व इतर राज्यातील मिळून ११०४३ पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ४०० ते १ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांमध्ये या वर्षी आंब्याचे पीक मुबलक आले आहे. प्रत्येक वर्षी मार्चपासून नियमित आवक सुरू होत असते. परंतु, या वर्षी फेब्रुवारीमध्येच आवक सुरू झाली आहे. सोमवारी देवगड व इतर ठिकाणांवरून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ४ ते ८ डझन पेटीची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे.
बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल अशी चिन्हे आहेत. आवक वाढू लागली आहे. मार्चमध्ये आवक अजून वाढून दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. हापूसला ग्राहकांचीही
पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.