ठाकरे गटाच्या नेत्याने घातला ६० कोटींचा गंडा, भूखंडावर हक्क सांगत घेतला मोबदला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 08:36 AM2023-09-16T08:36:30+5:302023-09-16T08:36:57+5:30
Navi Mumbai: विकलेला भूखंड स्वतःच्या ताब्यात असल्याचे भासवून तो मेट्रोच्या कामासाठी सिडकोला देऊन २५ गुंठे भूखंड हडपल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सिडकोची ६० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
नवी मुंबई - विकलेला भूखंड स्वतःच्या ताब्यात असल्याचे भासवून तो मेट्रोच्या कामासाठी सिडकोला देऊन २५ गुंठे भूखंड हडपल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सिडकोची ६० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी ठाकरे सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोला खारघर येथे मेट्रो प्रकल्पासाठी तसेच इतर महत्त्वाच्या प्रकल्पासाठी बेलपाडा येथील जमीन हवी होती. त्याठिकाणची २७ गुंठे जमीन ठाकरे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नावे होती. मात्र, त्यांनी सिडकोला हवी असलेली २५ गुंठे जमिनीचा के. एस. श्रिया इंफ्राबिल्ड आणि विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांसोबत सात कोटींचा करार करून त्याचे १ कोटी ९८ लाख रुपये घेतलेले आहेत. यादरम्यान सिडकोला देखील ती जमीन हवी असल्याची व त्या मोबदल्यात तेवढीच जमीन मिळणार असल्याचे घरत यांना समजले. यामुळे त्यांनी ही जमीन अद्यापही आपल्याच ताब्यात असल्याचे भासवून त्याची ताबा पावती सिडकोमध्ये सादर केली होती.
त्याद्वारे २५ गुंठे जमीन विकलेली असताना तिचा ताबा सिडकोकडे देऊन त्या मोबदल्यात खारघर सेक्टर ७ येथे २५ गुंठे जमीन मिळवली. त्यानंतर तिथे विकासकाम देखील हाती घेण्यात आले आहे. याचदरम्यान घरत यांच्याकडून जमीन विकत घेणाऱ्या कंपन्यांनी सिडकोत संपर्क साधला असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यावरून घरत यांनी सिडकोची ६० कोटींची, तसेच दोन कंपन्यांची देखील फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सिडको अधिकाऱ्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली असता आर्थिक गुन्हे शाखा तपास करत होती. त्यामध्ये फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच शुक्रवारी शिरीष घरत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.