रुळात अडकलेल्या प्रवाशाला वाचविण्यासाठी हलवली लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:18 AM2024-02-09T09:18:09+5:302024-02-09T09:18:35+5:30
वाशी स्थानकात रुळ ओलांडताना अपघात, लांबपर्यंत नेले फरफटत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकामध्ये सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी रेल्वेच्या धडकेने फलाट व रुळामधील अंतरात अडकून पडला. त्याला वाचविण्यासाठी प्रवाशांनी चक्क रेल्वे हलवण्याचा प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. लांबपर्यंत फरफटत नेल्याने जखमी झालेल्या प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले आहे.
कोपरखैरणे यथे राहणारे राजेंद्र खांडके (४८) हा रेल्वेने मुंबईला जात होता. लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक दोनवरून तीनवर जाण्यासाठी भुयारी पादचारी मार्गाचा वापर न करता थेट दोन फलाटांमधील रुळावर त्याने उडी मारली. नेमकी त्यावेळी पनवेलकडे जाणाऱ्या लोकलची त्याला धडक बसली. तो काही अंतरापर्यंत रेल्वेसोबत फरफटत गेल्याने फलाट व रूळमधील अंतरामध्ये अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी धावलेल्या प्रवाशांनी रेल्वेला हलवण्याचा प्रयत्न केला.
एकीच्या बळामुळे लोकलचा डबा हलवला
एकीच्या बळामुळे रेल्वेचा डबा काहीसा वाकडा करून राजेंद्र खांडके याला बाहेर काढून तातडीने वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले. रेल्वेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले.
रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी फलाट व रूळ यामधील अंतरात अडकला होता. यावेळी रेल्वे पुढे-मागे करणे शक्य नव्हते. अनेक प्रयत्नांनंतर रेल्वेखाली अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे.
- सचिन कटारे, पोलिस निरीक्षक, वाशी रेल्वे पोलिस
शॉर्टकर्ट
बेततोय जीवावर
चार दिवसांपूर्वीच जुईनगर रेल्वे स्थानकातदेखील रेल्वे प्रवाशाने रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वेसमोर रुळावर उडी मारली होती. यावेळी आरपीएफ जवानाच्या प्रयत्नामुळे त्यांचे प्राण वाचले होते. रेल्वे स्थानकातून बाहेर जाण्यासाठी रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानकाच्या दोन्ही टोकांकडील फलाटावर बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे काही प्रवासी थेट फलाटावरूनच रुळावर उडी मारून एकीकडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये त्यांच्या जीविताला धोका होत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या शॉर्टकटला प्रतिबंध कसा घालायचा, असा प्रश्न रेल्वे पोलिसांना पडला आहे.