नवी मुंबई : नेरुळच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ऑनलाइन वाईनची ऑर्डर चांगलीच महागात पडली आहे. वाईनच्या २,२०० रुपयांचे पेमेंट करूनही संबंधिताने ५७ हजार ८०० रुपयांची फसवणूक केली. नेरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला आहे. २७ वर्षीय तरुणी एम.एस. ऑर्थोचे शिक्षण घेत आहे. तिने जैसलमेर कंपनीच्या वाईनची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. यासाठी तिने नेरूळच्या पायना वाईन शॉपचा नंबर मिळवला. मात्र तिच्या हाती खोटी माहिती लागल्याने फोनवरील तरुणाने तिला वाईनचे अगोदर पेमेंट करण्यास सांगितले. यानुसार तिने २,२०० रुपये भरले असता, त्याने तिला रजिस्ट्रेशनच्या नावाखाली ऑनलाइन माहिती भरायला सांगितले. पाठवलेल्या लिंकवर तिने माहिती भरली असता दोनदा अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जमा झाली.