नारायण जाधव
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणार्या महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत ही १२ माळ्यांची राहणार असून त्यात सर्व सुविधा असणार आहेत. या नियोजित महाराष्ट्राच्या वास्तुचे सादरीकरण त्यासाठी पाठपुरावा करणार्या बेलापूरच्या आमदार मंगळवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्या दालनात सादर केले. यावेळी कैलास शिंदे हेही उपस्थित होते.
नियोजित महाराष्ट्र भवन हे १२ मजल्याचे असून अशा या सुंदर महाराष्ट्र भवनामध्ये व्हीआयपी रूम तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही रूम ही असणार आहेत. त्याचबरोबर विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थी,अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, ई लायब्री, कॉन्फरन्स हॉल, फूड प्लाझा अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे अशी प्रथमच वास्तू महाराष्ट्रामध्ये उभी राहणार राहणार आहे.
नवी मुंबई शहर वसवितांना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा व नोकरभरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र, जागा नसल्याने व हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या महाराष्ट्र भवनासाठी २०१४ पासून जो लढा चालला होता त्याला आज पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे त्यांनी आमदार म्हात्रे यांनी सांगितले.
महाराष्ट्र भवनाचे प्रथम दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१०० कोटींची तरतूद
नियोजित महाराष्ट्र भवनासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री असताना सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०० कोटींची तरतूदीची घाेेषणा केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सहकार्य केले आहे