नवी मुंबई : डीपीएस तलावाला लागून असलेल्या सीआरझेड १ क्षेत्रावरील ६०० मीटर बेकायदेशीर बंधाऱ्याबाबत पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीवरून केंद्राने महाराष्ट्र सागर किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाला चौकशी करण्याचे दिलेले निर्देश ताजे असतानाच आता ‘नॅटकनेक्ट फाउंडेशन’च्या तक्रारीवरून मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेली खारफुटी समितीही येत्या २९ मे रोजी या तलावास भेट देणार आहे. यामुळे हा बंधारा बांधणारा ठेकेदार आणि सिडकोचा पाय आणखी खोलात गेला आहे.
सिडकोने बांधलेला ६०० मीटर लांबीचा हा बंधारा आता ३० एकरावरील या तलावात येणारा भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखणारा कच्चा रस्ता बनला आहे. तो एका बाजूला खारफुटी आणि दुसरीकडे पाणथळ जमीन कापतो. हे सरळसरळ सीआरझेड १ नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे ‘नॅटकनेक्ट’चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रालयानेही दिले आहेत चौकशीचे निर्देश
गेल्याच आठवड्यात केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने ‘एमसीझेडएमए’ला डीपीएस तलावास भेट देऊन वस्तुस्थिती तपासून अहवाल देण्यास सांगितले आहे. मंत्रालयाचे अधिकारी टी. के. सिंग यांनी तसा ई-मेलही पाठवला आहे.
बंधाऱ्याने राेखला भरतीचा प्रवाह
हे निर्देश ताजे असतानाच आता ‘नॅटकनेक्ट’च्या तक्रारीवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खारफुटी समितीही येत्या २९ मे रोजी डीपीएस तलावाभोवती सिडकोने बांधलेल्या बंधाऱ्याची पाहणी करणार असल्याचे कुमार म्हणाले. याबाबत सागर शक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले की, खरे तर डीपीएस तलावात येणारा भरतीचा प्रवाह रोखणारा बांधल्याने अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. यामुळे कच्च्या रस्त्याने पाण्याच्या प्रवाहासाठी जी व्यवस्था केली आहे ती देखील आता ब्लॉक झाली आहे.
तलाव वाचविण्याची माेहीम झाली तीव्र
‘नॅटकनेक्ट’सह नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्व्हेशन सोसायटी, सेव्ह फ्लेमिंगो अँड मँग्रोव्हज, पारसिक ग्रीन्स, खारघर हिल आणि वेटलँड यांनी डीपीएस फ्लेमिंगो तलावात येणारा पाण्याचा प्रवाह वाचवण्याची मोहीम आधीच सुरू केली आहे. कारण अलीकडे येथे १० पेक्षा जास्त फ्लेमिंगो मरण पावले असून अनेक जखमी झाले आहेत. पाण्याचा प्रवाह रोखला गेल्याने तलाव कोरडा पडून फ्लेमिंगाेंना त्यांचे अन्न मिळत नसल्याने त्याच्या शोधार्थ इतत्र भरकटून त्यांचा मृत्यू होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.