मराठा समाज, माथाडींना न्याय देणार; धडाकेबाज कामगिरीची विरोधकांना धडकी - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 07:18 AM2022-09-26T07:18:27+5:302022-09-26T07:19:00+5:30

आम्ही जबाबदारी पेलणारे आहोत, जबाबदारीपासून पळणारे नाही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य.

The Maratha community will give justice to the leaders The opposition scared of our work Chief Minister eknath shinde dcm devendra fadnavis | मराठा समाज, माथाडींना न्याय देणार; धडाकेबाज कामगिरीची विरोधकांना धडकी - मुख्यमंत्री

मराठा समाज, माथाडींना न्याय देणार; धडाकेबाज कामगिरीची विरोधकांना धडकी - मुख्यमंत्री

Next

नवी मुंबई : राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, कामगारांचे आहे.  मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. मराठा आरक्षणासह सर्व समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. आम्ही जबाबदारी पेलणारे आहोत, जबाबदारीपासून पळणारे नाही. सरकार धडाकेबाजपणे काम करत असून आमच्या धडाक्याने विरोधकांना धडकी भरली असल्याची टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. कामाचा धडाका पाहून विरोधकांना धडकी भरली आहे. राज्यात ७५ हजार नोकरभरती केली जाणार असल्याचेही सांगितले.    कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार गणेश नाईक, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, शिवेंद्रसिंहराजे भाेसले, निरंजन डावखरे, महेश शिंदे, संजीव नाईक, संदीप नाईक उपस्थित होते. 

पाटील यांना पुन्हा महामंडळ देणार
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याकडे पुन्हा महामंडळाची धुरा दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

मागील सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले 
मागील सरकारच्या काळात अडीच वर्षांत मराठा समाजावर अन्याय झाला. अशोक चव्हाण यांनी आरक्षण घालविले.  चव्हाण यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असती तर परिस्थिती वेगळी दिसली असती. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे प्रश्नही सुटले नाहीत, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.

वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार 
माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. माथाडींच्या नावाखाली काहीजण वसुलीचे काम करत आहेत.  अशा वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकार कामगारांच्या सोबत असून प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले. 

देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाही : मुख्यमंत्री
पुणे येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या घटनेविषयी एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. येथे देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: The Maratha community will give justice to the leaders The opposition scared of our work Chief Minister eknath shinde dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.