-नारायण जाधवनवी मुंबई : एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत, नाचत-आनंद व्यक्त करत राज्यभरातून जमलेल्या मराठा बांधवांमुळे नवी मुबईत रात्रभर भगवे वादळ अवतरले. आता नाही तर कधीच नाही, या भावनेने सतत मराठा बांधव येथे जमत होते. त्यामुळे सायन-पनवेल मार्ग गर्दीने ओसंडून वाहात होता. ठिकठिकाणी करण्यात आलेली जेवणाची व्यवस्था, काहींनी रस्त्यातच मांडलेले ठाण... तेथेच घेतलेले जेवण यामुळे सारे वातावरण भारून गेले होते.
आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला. ते पहाटे सहकाऱ्यांसह नवी मुंबईत पोहोचले. या मोर्चाला नवी मुंबईतच थांबवण्याचे प्रयत्न सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर सुरू होते.
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाबाबत नोटीस दिली असली, तरी आम्ही हौस म्हणून मुंबईला निघालेलो नाही, आता आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असा निर्धार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ते २६ जानेवारीला सकाळी नवी मुंबईतून मुंबईसाठी निघतील. आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनासाठी स्टेजची बांधणी सुरू आहे.
झाेपेत असताना घेतल्या सह्या : मनाेज जरांगे पाटीलमी आज सकाळी झोपेत असताना काही पोलिस अधिकाऱ्यांनी लोणावळ्यात न्यायालयाचा आदेश आहे असे सांगत आझाद मैदानाची परवानगी नाकारलेल्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या. नंतर समजले तो कागद परवानगी नाकारलेला होता, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचा होता, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी काय दिली कारणे?
मुंबईत दररोज अंदाजे ६० ते ६५ लाख नागरिक हे नोकरीनिमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात. आंदोलक मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल. आझाद मैदानाची क्षमता ५ ते ६ हजार आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे; तेथे आंदाेलकांसाठी मैदानात पर्याप्त जागा व सोयी-सुविधादेखील नाहीत. मुंबईत जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहने, अरुंद रस्ते, पर्यायी रस्त्यांचा अभाव, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड, इतर अत्यावश्यक सेवांवरील परिणाम पाहता मुंबईतील सार्वजनिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. आंदाेलकांना आवश्यक सोयी-सुविधा मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही. आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान हेच संयुक्तिक राहील.