-अरुणकुमार मेहत्रे/ वैभव गायकरपनवेल/कळंबोली : मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा काढली आहे. गुरुवारी पदयात्रा सकाळी १० च्या सुमारास पनवेलमध्ये धडकणार आहे. या पदयात्रेच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव पनवेलमध्ये एकवटणार आहेत. मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांसाठी रायगड सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी भोजन स्टाॅल लावण्यात येणार आहेत.
मराठा नेते मनोज जरांगे शेकडो आंदोलकांसह मुंबईकडे रवाना होत आहेत. मुंबईपूर्वीचा शेवटचा मुक्काम हा लोणावळा येथे होणार आहे. त्यानंतर ते पनवेल, नवी मुंबईकडे रवाना होणार आहेत. या तब्बल १० लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार १० लाख मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलावची व्यवस्था केली आहे. घराघरांत भाकरी तयार करणार आहेत.
मंडळांचेही स्टाॅल पदयात्रेच्या मार्गावर मराठा बांधवांच्या नाश्ता व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी विविध संघटना व मंडळांनी स्टॉल्स उभारण्याची तयारी दर्शविली आहे. सकाळपासूनच तेथे चहा, बिस्किटे, पोहे, फूड पॅकेट, फरसाण यासह फळे व पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे.
घराघरांतून भाकरीसमाजबांधवांसाठी मराठा समाजातून घरोघरी १० भाकरी किंवा २५ चपात्या, चटणी, ठेचा, लोणचे आदी पदार्थ जमा करणार आहेत. हे अन्न संकलित करण्याचे काम बुधवारपासून सुरू आहे; तसेच कामोठे, कळंबोली, खारघर पदयात्रा मार्गावर विविध संघटनांमार्फत जेवणही बनविले जाणार आहे.
सकल मराठा समाज मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पदयात्रेचे पनवेल तालुक्यात जंगी स्वागत आम्ही करणार आहोत. यावेळी लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुस्लिम, शीख समाजानेही अन्नदानासाठी हात पुढे केला आहे. - रामदास शेवाळे, समन्वयक, सकल मराठा समाज