कोव्हिड प्रतिबंधासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज, बैठकीत आयुक्तांनी घेतला आढावा

By योगेश पिंगळे | Published: December 22, 2023 06:00 PM2023-12-22T18:00:01+5:302023-12-22T18:00:34+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील आरोग्य स्थितीचा आढावा घेतला असून सतर्कतेचे निर्देश दिल्यानुसार नवी मुंबई महापालिका यंत्रणा तपासणी, उपचार व नियंत्रणात्मक उपाययोजनांकरीता सज्ज झालेली आहे.

The municipal system is ready for the prevention of covid, the commissioner reviewed in the meeting | कोव्हिड प्रतिबंधासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज, बैठकीत आयुक्तांनी घेतला आढावा

कोव्हिड प्रतिबंधासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज, बैठकीत आयुक्तांनी घेतला आढावा

नवी मुंबई : काही राज्यांमध्ये कोव्हीडचा जेएन- १ या नवीन विषाणूप्रकारातले रुग्ण आढळत असून सिंधुदूर्ग, ठाणे भागातही काही रुग्ण आढळले आहेत. या अनुषंगाने खबरदारी घेत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बैठक घेत आरोग्य यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांना दक्षतेने सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील आरोग्य स्थितीचा आढावा घेतला असून सतर्कतेचे निर्देश दिल्यानुसार नवी मुंबई महापालिका यंत्रणा तपासणी, उपचार व नियंत्रणात्मक उपाययोजनांकरीता सज्ज झालेली आहे.

नवीन प्रकारच्या कोव्हिड विषाणूमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी यामध्ये तीव्र लक्षणे आढळत असून कोरडा खोकला दीर्घकाळ राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषत्वाने सहव्याधी (कोमॉर्बिड) असणारे रुग्ण, आजारी असणारे ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांनी दक्षता घेण्याची गरज असून गर्दीच्या ठिकाणी व आजाराची लक्षणे असल्यास मास्क वापरणे गरजेचे आहे. आता नाताळचा सण असून नववर्षाचा समारंभ साजरा करण्यासाठी नागरिक मोठया प्रमाणावर एकत्र जमण्याचे प्रसंग लक्षात घेऊन आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अथवा मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. 

अशा स्थितीत महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षमतेने कार्यरत राहण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये वाशी, नेरुळ व ऐरोली या महानगरपालिकेच्या तीन रुग्णालयात व्हेंटीलेटर्ससह ६० आयसीयू बेड्सची कोव्हीड रुग्णालय स्वरुपातील सुविधा, २०० ऑक्सिजन बेड्सची कोव्हीड आरोग्य केंद्र सुविधा आणि २०० सर्वसाधारण बेड्सची कोव्हीड काळजी केंद्र सुविधा  तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. दैनंदिन ओपीडीमध्ये जे रुग्ण संशयित वाटतात त्यांची कोव्हीड टेस्ट करुन घेण्याबाबत काळजी घ्यावी व या कार्यवाहीकडे नियमीतपणे बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकारी यांची त्वरीत नेमणूक करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. 

यामधील अधिक काळजी घेण्याची गरज असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याचेही सूचित केले. त्यासोबतच अनुषांगिक रुग्णालयीन सुविधा, मनुष्यबळ, औषधे, पीपीई किट्स, मास्क,  सॅनिटायझर अशा विविध बाबींची उपलब्धता तपासून घ्यावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सोमनाथ पोटरे, डॉ.श्रीराम पवार, योगेश कडूसकर, डॉ.राहुल गेठे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरीष आरदवाड, वैदयकीय अधिकारी डॉ. अजय गडदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोव्हिड टेस्टिंगसाठी लॅब सक्षम ठेवा
नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची ४ हजार चाचण्या प्रतीदिन क्षमतेची आरटीपीसीआर लॅब असून ती कोव्हिड टेस्टिंगसाठी सक्षमतेने कार्यान्वित राहील याकडेही विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. येथील चाचण्यांवर कोव्हीड नियंत्रणासाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्याने बारकाईने लक्ष देण्याचे व दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

कोव्हिडचा नवीन विषाणू आढळला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नसून कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच चुकीच्या माहिती व बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आजाराची लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व मास्कचा वापर करावा आणि योग्य औषधोपचार घ्यावा.
- राजेश नार्वेकर, आयुक्त न.मुं.म.पा.

Web Title: The municipal system is ready for the prevention of covid, the commissioner reviewed in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.