नवी मुंबई: नवी मुंबई शहर हे नेदरलँडच्या धरतीवर बांधण्यात आले आहे. भरतीच्या वेळी खाडीतील पाणी शहरात घुसू नये यासाठी शहरात अंतरा-अंतरावर चॅनल काढले आहेत. त्याच धर्तीवर पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास ठिकठिकाणी सिडकोने होल्डिंग पाँडसह पम्पिंग स्टेशनही बांधली आहेत. यातील वाशी आणि बेलापूर येथील सिडकोकालीन जुने पम्पिंगचे बांधकाम तोडून त्या जागी नवे पम्पिंग बांधण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. या कामावर अंदाजे ६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.
वाशी सेक्टर सेक्टर ८ मधील सर्व्हे क्रमांक १७ वर नऊ हजार चौरस मीटरचे पम्पिंग स्टेशन आहे. बेलापूर सेक्टर १२ मधील सर्व्हे क्रमांक ४६६ ए भूखंडावरील पम्पिंग स्टेशनचा एरिया सर्वात मोठा म्हणजे १६ एकर इतका आहे. बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनचे क्षेत्र मोठे असण्याचे कारण म्हणजे या पम्पिंग स्टेशनमध्ये सेक्टर १ ते ९ सह सेक्टर ११, १२ मधील पाणीही जमा होते.
सीआरझेड मंजुरीची प्रतीक्षावाशीच्या पम्पिंग स्टेशनच्या बांधकामासाठी ३२ कोटी तर बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनच्या बांधकामावर ३६ कोटी खर्च अपेक्षित आहे. सध्या याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. प्राधिकरणाच्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बैठकीत त्यास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली.
या बांधकामांचा आहे समावेशवाशी आणि बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनचे बांधकाम सिडकोकालीन असून कालौघात ते अतिशय जुने आणि जिर्ण झालेले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती आहे. यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी दोन्ही पम्पिंग स्टेशनचे बांधकाम नव्याने करण्यात येणार आहे, त्यामध्ये जुनी प्लिन्थ तोडून नव्याने बांधणे, भितींचे बांधकाम करणे, इलेक्ट्रिकल कामांसह सर्व मशिनरी नव्याने बसविण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही पम्पिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील, असा आशवाद शहर अभियंता संजय देसाई यांनी व्यक्त केला.