नवी मुंबई : महानगरपालिकेच्या नेरूळ येथील रुग्णालयामध्ये १० फेब्रुवारीला जुळ्या मुलांचा जन्म झाला. २६ आठवड्यात जन्म झाल्यामुळे दोन्ही मुलांच्या फुफ्फुसाचा पूर्ण विकास झाला नसल्यामुळे मुलांना एनआयसीयूमध्ये ठेवावे लागले होते. चार महिने यशस्वी उपचार करून या दोन्ही मुलांचा जीव वाचविण्यात महानगरपालिकेच्या डॉक्टरांना यश आले आहे.
सारसोळे सेक्टर ६ मध्ये राहणाऱ्या सान्वी स्वप्नील मोहिते यांना १० फेब्रुवारीला नेरूळमधील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना जुळी मुले झाली. सामान्यपणे गर्भधारणेनंतर ३४ आठवड्यात फुफ्फुसांचा पूर्णपणे विकास होतो. परंतु या मुलांचा २६ आठवड्यातच जन्म झाला होता. दोघांचीही प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलांना तत्काळ एनआयसीयू विभागात हालवून व्हेंटीलेटर लावला. फुफ्फुसे बनविण्यासाठी महागडे असणारे सरफॅक्टन्ट हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले. चार महिने व्हेंटीलेटर, सईपॅप ते रूम एअर हा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करण्यात आला. व्हेंटीलेटरवरून बाहेर पडल्यानंतर बाळाचे वजन वाढविण्यासाठीही कसरत करावी लागली.सर्व प्रयत्नांना यश आले असून चार महिन्यानंतर जुळी मुले सुखरूपणे खरी पोहचली असून पालकांनी मनपाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
नेरूळ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उध्वर खिल्लारे, डॉ. सुषमा तायडे, डॉ. अशोक राठोड, प्रशांत भोसले, सुरज घारे, मनीषा शिंदे, वैभव भगत, राजेंद्र बोराडे, नम्रता जगदाळे, ज्ञानेश्वर मोरे. राजकुमार सहानी, मेट्रन सिस्टर श्वेता वऱ्हाडे यांच्यासह इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनीही सर्व डॉक्टरांचे कौतुक केले आहे.
वर्षभरात एनआयसीयूमध्ये ४४९ मुलांवर उपचार
महानगरपालिकेच्या नेरूळ रुग्णालयाच्या एनआयसीयू मध्ये वर्षभरात ४४९ बालकांवर उपचार करण्यात आले. १ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या १५ बालकांवर व १ ते दिड किलो वजनाच्या ५१ बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.