महापालिकेने तोडलेल्या रोपवाटिकेचे पाम बीचवर पुन्हा बस्तान
By नारायण जाधव | Published: April 19, 2024 03:43 PM2024-04-19T15:43:39+5:302024-04-19T15:44:34+5:30
हे अतिक्रमण कायमचे तोडून त्याठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी महापालिकेकडे केली आहे.
नवी मुंबई :नवी मुंबईतील पाम बीच रस्त्यावरील भूखंडांना कोट्यवधींचे माेल असून येथील डीपीएस शाळेसमोरील एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बाहेर एका माेक्याच्या जागेवर बेकायदेशीर रोपवाटिका फेब्रुवारी महिन्यात तोडल्यानंतर आता ती पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामुळे हे अतिक्रमण कायमचे तोडून त्याठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी महापालिकेकडे केली आहे.
या ठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित केल्यास ती पालक आणि डीपीएस शाळेतील अभ्यागतांना विश्रांतीसाठी हक्काचे ठिकाण होऊ शकते, तसेच स्पर्धा परीक्षा किंवा बोर्ड परीक्षांसाठी येणाऱ्यांनाही तिथे विश्रांती घेता येईल. कारण या भागात आश्रय घेण्यासाठी जागा नसते. अशी सूचना पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी केली आहे.
या रोपवाटिकेत रात्री असामाजिक घटकांचा वावर होत असल्याची तक्रार केल्यानंतर महापालिकेेचे तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी रोपवाटिका तोडून तो परिसर अतिक्रमणमुक्त केला होता. मात्र, सुरक्षारक्षक बदलून ही राेपवाटिका पुन्हा अस्तित्वात आल्याने संताप व्यक्त होत आहे.