RBI समोर दोन हजारांच्या नोटा बदलीच्या रांगेतील लोक रोजंदारीवरचे?
By कमलाकर कांबळे | Published: December 19, 2023 09:01 PM2023-12-19T21:01:36+5:302023-12-19T21:02:09+5:30
बहुतांश लोक मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण भागातील
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सीबीडी येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर नागरिकांची झुंबड उडत आहे. विशेष म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी सकाळपासून लांबच लांब रांग लागत आहे. नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे असलेले सर्व नागरिक रोजंदारीवर असल्याची चर्चा सुरू आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. नोटा बदलून घेण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे या मुदतीनंतर विविध बँकांनी या नोटा घेणे बंद केले. परंतु आरबीआय बँकेत या नोटा बदलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सीबीडी बेलापूर येथील रिझर्व्ह बँकेसमोर नोटा बदलण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु या नोटा बदलण्यासाठी आलेली मंडळी रोजंदारीवर असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे नोटा बदलण्याच्या रांगेत उभे राहिलेले बहुतांश मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आदी भागातून आल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले आहे. दोन हजारांच्या नोटा थेट बदलून न देता त्या जर खात्यात जमा केल्या गेल्या तर यातून या नोटा बंद करण्यामागचा हेतू साध्य होईल, असे सामाजिक कार्यकर्ते तथा नवी मुंबई अलर्ट सिटिजन्स फोरमचे प्रवर्तक सुधीर दाणी यांनी सांगितले.