नवी मुंबई : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील चार लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे. भिवंडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ऐरोली, रबाळे परिसरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे ऐरोलीत राहणाऱ्या मयूर सैतवॅल यांच्या घरी भरदिवसा घरफोडी झाली होती. त्यामुळे परिसरात घरफोडी करणाऱ्यांच्या शोधात रबाळे पोलिस होते. यादरम्यान ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही तपासणीत सराईत गुन्हेगार शफिक शेख उर्फ टोपी हा परिसरात वावरत असल्याचे दिसून आले होते. यामुळे त्याच्या शोधासाठी वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी निरीक्षक उन्मेश थिटे, सहायक निरीक्षक दीपक खरात, उपनिरीक्षक दयानंद वणवे, हवालदार प्रसाद वायंगणकर, दर्शन कटके, विजय करंकाळ आदींचे पथक केले होते.
त्यांनी शफिक याच्या भिवंडी येथील राहत्या परिसराची माहिती मिळवून तब्बल सात दिवस पाळत ठेवली होती. अखेर तो नजरेस पडताच त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले होते. यावेळी त्याने ऐरोली परिसरात केलेल्या पाच गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये त्याच्याकडून सुमारे ४ लाख रुपये किमतीचे चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.