पावसाळापूर्व साफसफाईच्या ठेक्यांना 'हँगओव्हर'चा फटका; अनेकांच्या निविदा लटकल्या!
By नारायण जाधव | Published: April 1, 2024 04:14 PM2024-04-01T16:14:20+5:302024-04-01T16:14:47+5:30
मुदतवाढ देण्याची ठेकेदारांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पावसाळ्यात शहरांत गटारे, नाले तुंबून कोठेही पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई महापालिकेकडून दरवर्षी आपल्या हद्दीत साफसफाई करण्यात येते. त्यानुसार महापालिकेेने यंदाही अशा साफसफाईची १०० हून अधिक कामे काढली आहेत. १ एप्रिल २०२४ ही त्यासाठी अखेरची मुदत होती; मात्र सोमवारी सकाळपासूनच अनेक ठेकेदारांना महा टेंडरसह स्टेट बँकेच्या वेबसाईटवर निविदा भरण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. अनेकांना वेबसाईट हँग-ओव्हरचा झाल्याने निविदा भरता आली नसल्याच्या तक्रारी करून मुदतवाढ देण्याची मागणी केली.
शहरात एमआयडीसी आणि झोपडपट्टी परिसरात नाल्यांची संख्या मोठी आहे. तसेच सिडकोने बांधलेली पावसाळी गटारे आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास साचणारे पाणी या गटारे आणि नाल्यांद्वारे ठाणे खाडीला मिळते. त्यामुळे नवी मुंबई महापालिका दरवर्षी त्यांची नित्यनियमाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच साफसफाई करते. त्यानुसार यंदा यासाठी निविदा भरण्याचा सोमवारी शेवटची मुदत होती; मात्र सकाळपासूनच १०० च्यावर असलेल्या कामांच्या निविदा भरण्यासाठी ठेकेेदारांनी वेबसाईट उघडल्या असता अनेकांना कागदपत्रे, स्टॅम्पपेपर सबमिट करण्यास अडचणी आल्या. अनेकांनी वेबसाईट हँग होत असल्याची, स्लो झाल्याच्या तक्रारी केल्या. यामुळे या निविदा भरण्यास आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली.
पावसाळापूर्व साफसफाईच्या निविदा भरण्याची सोमवारी शेवटची मुदत होती; मात्र वेबसाईट हँग होणे किंवा स्लो चालणे यात नवी मुंबई महापालिकेची कोणतीही चूक नाही. आमच्या निविदा महाटेंडरद्वारे स्वीकृत करण्यात येतात. यामुळे महाटेंडर आणि स्टेट बँक यांच्या वेबसाईटशी महापालिकेेचे कोणतेही देणे-घेणे नाही.
-डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापन, नवी मुंबई महापालिका