पंतप्रधान नवी मुंबईत येणार, पण सभा नेमकी घेणार कुठे? सिडकोसमोर माेठा पेचप्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:28 PM2023-10-11T14:28:28+5:302023-10-11T14:29:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील नियोजित दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा मागील दहा-बारा दिवसांपासून कामाला लागल्या आहेत.
नवी मुंबई : राज्य सरकारने नवी मुंबईत नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदान निश्चित केले होते. त्या अनुषंगाने प्राथमिक कार्यवाहीसुद्धा सुरू केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी सेंट्रल पार्क मैदानाची पाहणी केली. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेसह इतर काही ठिकाणांचीही या पथकाने पाहणी केल्याचे समजते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित कार्यक्रम कुठे होणार याबाबत अधिकाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील नियोजित दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा मागील दहा-बारा दिवसांपासून कामाला लागल्या आहेत. या सोहळ्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी हा कार्यक्रम खारघर येथील सिडकोच्या सेंट्रल मैदानावर होईल, असे सुरुवातीपासून बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्याची सिडकोची योजना आहे.
दसऱ्याच्या मुहूर्ताला कार्यक्रमाची शक्यता
या नियोजित कार्यक्रमाच्या तारखेवरूनसुद्धा अद्याप संभ्रम आहे. कारण पंतप्रधान कार्यालयाकडून या कार्यक्रमाविषयीचा कोणताही कार्यक्रम आयोजकांना प्राप्त झालेला नाही. असे असले तरी १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान कोणत्याही एका तारखेला हा कार्यक्रम होईल, अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र ही शक्यतासुद्धा धूसर असून दसऱ्याचा मुहूर्त साधण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
- सिडको व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सोमवारी मुंबईत बैठक घेऊन कार्यक्रमाबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील पथकाने कार्यक्रम स्थळांची व तयारीची पाहणी केल्याचेही समजते.
- या पथकाने सिडकोच्या बेलापूर येथील गेस्ट हाऊसमध्ये बैठक घेऊन चर्चा केली. दरम्यान, सेंट्रल पार्कऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जागेबाबत चर्चा केल्याचे समजते.