गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प
By नारायण जाधव | Published: June 13, 2023 05:38 PM2023-06-13T17:38:59+5:302023-06-13T17:39:34+5:30
सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.
नवी मुंबई : जलवाहिन्या दुरुस्तीमुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून नवी मुंबईतील काही भागात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय अधून-मधूनही गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी असतात. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेने आता मोरबे धरणावर भोकरपाडा येथे १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.
मोरबे धरण ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेने त्याकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भोकरपाडा येथे बांधलेल्या ३०० एलएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढून तो ४५० एमएलडीचा केला. मात्र, कालौघात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९८७ बांधलेल्या या जलशुद्धीकरण प्रकल्प जीर्ण होत चालला असून त्याची क्षमता खंगत चालली आहे. अनेक ठिकाणची यंत्रसामग्री जीर्ण होत चालली आहे. तिची तांत्रिक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. शिवाय तिथे जी टेक्नॉलाॅजी वापरली आहे, तीसुद्धा कालबाह्य होत चालली आहे. यामुळे काही बिघाड झाल्यास ती दुरुस्त करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. यामुळे शहरात जलशुद्धीकरणात अडचणी येत आहेत. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली हाेती.
नव्या प्रकल्पावर ४७ कोटींचा खर्च
या सर्वांवर कायमस्वरुपी उपाय म्हणून सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांशेजारी जी मोकळी जागा आहे, त्यावर १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणी नवे फिल्टरबेड टाकण्यात येणार आहे. या कामावर ४७ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई दिली. सध्या याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर गढूळ पाण्याची कटकट दूर होणार असल्याचे ते म्हणाले.
जुना प्रकल्प मोडीत काढणार
नवा १५० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने नंतर वाढविलेल्या १५० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जुन्या ३०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प मोडीत काढण्यात येणार आहे.
नवा जलकुंभ ही बांधणार
जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात २.५ एमएलडी क्षमतेचा नवा जलकुंभ ही बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामावर १९ कोटी ५० रुपये खर्च अपेक्षित आहे.