नवी मुंबई : विकासाच्या मुद्यांवरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. प्रकल्पग्रस्तांसह शहरातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहोत. गरजेपोटी बांधलेली घरे, एफएसआय, दर्जेदार वाहतूक व्यवस्था, सक्षम आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
महायुतीचे ठाणे मतदार संघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये कोपरखैरणे ते ऐरोली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. विकासाचा अजेंडा घेवून आम्ही जनतेसमोर आलो आहोत. नवी मुंबईमधील भुमीपुत्रांची गरजेपोटी बांधलेली घरे, माथाडी कामगारांसह सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. नवी मुंबईकरांनाही दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न यापुर्वीही सोडविण्यात आले यापुढेही सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल. काही जण दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सत्तेसाठी शिवसेनाप्रमुखांचे विचार साेडले. पण आपण शिवसेनाप्रमुखांचे विचार घेवून काम करत असून महायुतीचे सर्व घटकपक्ष निवडणुकीत परिश्रम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या रॅलीमध्ये आमदार गणेश नाईक, रविंद्र फाटक, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर, शिवराम पाटील, आमदार रमेश पाटील, ममीत चौगुले, यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.महायुतीचे नवी मुंबईकरांना आश्वासन.मानखुर्द नवी मुंबई व नवी मुंबई ते विमानतळापर्यंत मेट्रोचे जाळे तयार करणार.नवी मुंबई अंतर्गत मेट्रो मार्गीका तयार करण्यास प्राधान्य.वाशीतील पासपोर्ट कार्यालयाचे अधुनीकीकरण करणार.घणसोलीमध्ये क्रीडासंकूल उभारण्यास प्राधान्य.ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमध्ये रोजगाराभीमूख उद्योग आणण्यास प्राधान्य.नवी मुंबईमध्ये आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था सुरू करण्यासाठी पाठपुरावा.एम्सच्या धर्तीवर दर्जेदार रूग्णालयाची उभारणी करण्यास प्राधान्य .गरजेपोटी बांधलेली घरे, एफएसआयसह नागरी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य.