एकाच कार्यालय दोन वेळा फोडलं, दुसऱ्या प्रयत्नात चोरटे रिकाम्या हाती परतेज; ऐरोलीतली घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 3, 2023 06:08 PM2023-10-03T18:08:21+5:302023-10-03T18:08:52+5:30
ऐरोली सेक्टर ४ मधील क्लिनसेप सिस्टिम कंपनीच्या कार्यालयात ही घटना घडली आहे.
नवी मुंबई : ऐरोली येथील एका कार्यालय सलग दोन वेळा फोडल्याची घटना घडली आहे. पहिल्या दिवशी चोरट्याच्या हाती पाच हजार रुपये लागले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. ऐरोली सेक्टर ४ मधील क्लिनसेप सिस्टिम कंपनीच्या कार्यालयात ही घटना घडली आहे.
कार्यालयीन कर्मचारी शुक्रवारी कार्यालयात आले असता त्यांना दोन्ही दरवाजाचे टाळे तुटलेले आढळून आले. यामुळे त्यांनी वरिष्ठांना कळवले असता त्यांनी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी कार्यालयातून पाच हजार रुपये चोरीला गेल्याचे उघड झाले. मात्र चोरी होऊनही रक्कम छोटी असल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार करायचे टाळले होते. तर दोन्ही दरवाजाला नवे टाळे बसवण्यात आले होते.
मात्र, शनिवारी सकाळी कार्यालयात कर्मचारी आले असता, पुन्हा दोन्ही दरवाजाचे टाळे तुटल्याचे आढळून आले. यामुळे कार्यालयातील वस्तूंची पाहणी केली असता चोरट्याने काहीच नेले नसल्याचे समोर आले. पहिल्या घटनेनंतर कार्यालयात रक्कम ठेवण्यात आली नव्हती. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी चोरीचा प्रयत्न करूनही चोरट्याला रिकाम्या हाती परतावे लागले. मात्र हा प्रकार दोन वेळा घडल्याने अखेर कंपनीतर्फे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
यानुसार सोमवारी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एकाच ठिकाणी दोनदा हा प्रकार घढल्याने, यात एकाच गुन्हेगाराचा समावेश आहे कि वेगवेगळ्या गुन्हेगारांनी गुन्हा केला? याचा अधिक तपास रबाळे पोलिस करत आहेत. मात्र या घटनेवरून परिसरातील बंद घरे, कार्यालये यावर चोरट्यांनी नजर असल्याचे दिसून येत आहे.