पत्नीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या फरार पतीचा शोध सुरू, तळोजाच्या खैरणे गावातील घटना
By नारायण जाधव | Published: February 12, 2024 06:44 PM2024-02-12T18:44:01+5:302024-02-12T18:44:28+5:30
याबाबतचा गुन्हा दोन दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला असून, फरार असलेला अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई :पनवेल तालुक्यातील तळोजा येथील खैरणे गावात २० जानेवारी २०२४ रोजी पत्नी हैदराबादला येत नाही, याचा राग येऊन पतीने तिच्यावर ॲसिड हल्ला केला होता. याबाबतचा गुन्हा दोन दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला असून, फरार असलेला अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू आहे.
पश्चिम बंगाल येथील मूळ निवासी असणारे रमजान गाझी आणि अमिना खातून हे दाम्पत्य खैरणे गावातील प्लॉट नंबर १७ रिझवान कंपनी शेजारी भाड्याने राहत होते. रमजान हा बांधकामात मजूर असून, अमिना ही कंपनीत कंत्राटी तत्वावर कामाला जात असे. या दोघांनाही तीन मुले आहेत. मागील काही दिवसांपासून रमजानने आपण हैदराबादला जेथे बहीण राहते तिकडेच काम पाहू आणि तिकडेच राहण्याचा हट्ट अमिनाकडे केला. यास तिचा विरोध होता. यातूनच त्यांच्यात १९ जानेवारीला रात्री असेच भांडण झाले होते. पहाटे दोन वाजता अमिना व मुले झोपली होती. ॲसिड घेऊन आलेल्या रमजानने मुले झोपलेली असताना अमिनाला उठवून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून तिला जखमी केले. यात तिचा चेहरा २० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने शेजारच्यांनी तिला तातडीने औषधाच्या दुकानातून आणलेले मलम लावल्यानंतर तिने येथे न राहण्याचा निर्णय घेऊन रेल्वेने गाव गाठले. सध्या तिच्यावर कोलकातातील एनसीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या परिसरातील बनियापुकुर या स्थानिक पोलिसांनी संबंधित घटनेचा गुन्हा नोंदविल्यानंतर तो पनवेल तालुका पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. त्यांनी १० फेब्रुवारीला याबाबतचा रीतसर गुन्हा नोंदविला असून, फरार रमजानचा शाेध सुरू केला आहे.