पावणेतील ती वनराई वाचण्याची चिन्हे; गणेश नाईकांच्या पुढाकारानं २०० वृक्षांना जीवदान
By नारायण जाधव | Published: June 27, 2024 04:19 PM2024-06-27T16:19:20+5:302024-06-27T16:19:34+5:30
मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली.
नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे येथील एमआयडीच्या भूखंडावरील २०० वृक्षांना जीवदान मिळण्याची चिन्हे आहेत. पावणेतील ओएस-७ या भूखंडावर एका खासगी पेट्रो-केमिकल कंपनीने २० वर्षांपूर्वी वनराई विकसित केली आहे. मात्र, याच भूखंडावर एमआयडीसीने स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंड देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी किमान २०० वृक्ष तोडावे लागणार आहेत. याला स्थानिक वृक्षप्रेमींसह नॅट कनेक्ट फाउंडेशनने विरोध करून ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना ते वाचविण्याची गळ घातली होती. तिला प्रतिसाद देऊन नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी नवा भूखंड शोधण्याचे निर्देश एमआयडीला दिले आहेत.
वनराईने बहरलेला हा भूखंड वाचविण्यासाठी याआधी येथील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवला असून त्यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. अशातच मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली.
तसेच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील पर्यावरणाचे विषय मांडण्याची त्यांना विनंती केली. यानंतर नाईक यांनी पर्यावरणप्रेमींच्या मागणीला पाठिंबा देऊन एमआयडीसीला ओएस-७ हा भूखंड सोडून प्रकल्पांसाठी दुसरी पर्यायी जागा शोधण्यास सांगितले आहे.
हिरवळ वाचविण्याची जबाबदारी महापालिकेची
एवढेच नव्हे तर काळजी करू नका, जर कोणी झाडांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी प्रत्यक्षपणे घटनास्थळी येईन, असे आश्वासन नाईक यांनी दिले असल्याचे कुमार म्हणाले. एक एकरचा भूखंड हा मुळात दलदलीचा परिसर होता. एमआयडीसीत हायड्रोकार्बन्सचा व्यवहार करणाऱ्या खासगी कंपनीने २० वर्षांपूर्वी तो हरित क्षेत्र म्हणून विकसित केला होता. कंपनीने वृक्षारोपण केले असून, आता २०० परिपूर्ण झाडे बहरली आहेत. यात वाढलेली खजुरासह अनेक फुलझाडे आहेत. आता ही हिरवळ वाचवण्याची जबाबदारीही नवी मुंबई महापालिकेेची आहे. त्यासाठी अमृत मिशनच्या निधीचा वापर करावा, अशी सूचना बी.एन. कुमार यांनी केली आहे.