चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात, कोकण रेल्वेच्या विशेष साप्ताहिक गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:46 PM2024-03-07T14:46:47+5:302024-03-07T14:47:08+5:30
होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.
नवी मुंबई : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने १९ ते २७ मार्च या दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांसाठी ८ मार्चपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीच आरक्षण करून ठेवले आहे. असे असले, तरी कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षायादीही तितकीच मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता
आहे.
ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद ते मडगाव जंक्शन या दरम्यान साप्ताहिक गाडीच्या विशेष दोन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या स्थानकांमध्ये मिळणार थांबा
- अsहमदाबाद-मडगाव जंक्शन (०९४१२) ही विशेष साप्ताहिक गाडी अहमदाबाद जंक्शन येथून १९ आणि २६ मार्च असे दोन दिवस चालविली जाणार आहे. त्याचप्रमाणे, मडगाव जंक्शन-अहमदाबाद जंक्शन ही विशेष साप्ताहिक गाडी मडगाव जंक्शन येथून २० आणि २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुटणार आहे.
- या गाडी वडोदरा जंक्शन, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, येथे थांबेल. कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.