विमानाची ‘टेस्ट राइड’ नवी मुंबईतून टेक ऑफ; विमानतळावर सिग्नल यंत्रणेची पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 06:51 AM2024-07-18T06:51:08+5:302024-07-18T06:51:21+5:30
१३ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजरापू नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन मार्च २०२५ पासून येथून उड्डाण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून ही विमान चाचणी घेण्यात आली.
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान उडताना आणि उतरताना कोणता अडथळा तर येत नाही ना, हे पाहण्यासाठी बुधवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सिग्नलसह विमानांची चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठविण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विशेष विमान नवी मुंबई विमानतळावरून उडणार असल्याचे समजताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
१३ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजरापू नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन मार्च २०२५ पासून येथून उड्डाण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून ही विमान चाचणी घेण्यात आली.
नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा सिडकोचा अंदाज आहे.