नवी मुंबई : सिक्युरिटी एजन्सी चालकाचेच कार्यालयातून पिस्तूल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. कार्यालयाच्या बनावट चाव्या वापरून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात पिस्तूल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्कॉटलँड सिक्युरिटी एजन्सीच्या सीबीडी येथील कार्यालयात हा प्रकार घडला आहे. एजन्सी चालक बाळासाहेब बोरकर (६५) हे स्वरक्षणासाठी परवाना असलेले पिस्तूल वापरत होते. मात्र चार दिवसांपूर्वी ते कार्यालयातल्या ड्रॉवर मध्येच पिस्तूल ठेवून गेले होते. यावेळी पिस्तूल मध्ये चार बुलेट देखील भरलेले होते. २८ ऑगस्टला ते कार्यालयात आले असता ड्रॉवर मध्ये त्यांना पिस्तूल आढळून आले नाही. यामुळे त्यांनी इतरत्र शोधाशोध करून अखेर ३० ऑगस्टला रात्री सीबीडी पोलिसांकडे पिस्तूल चोरीची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र या घटनेमुळे चिंता व्यक्त होत असून या पिस्तुलाचा वापर गुन्हेगारी कृत्यासाठी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तर पिस्तूल चोरीला गेल्यानंतर बोरकर यांनी तात्काळ पोलिसांना कळवणे आवश्यक असतानाही दोन दिवसांनी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. शिवाय सिक्युरिटी एजन्सीच्या कार्यालयाच्या बनावट चाव्या वापरून घडलेल्या या घटनेमुळे एजन्सीच्या कार्यालयाच्याच सुरक्षेतला हलगर्जीपणा समोर आला आहे.