मधुकर ठाकूर -
उरण : उरणच्या बाजार पेठेत आज नागरिकांनी बर्निंग मिनी ट्रकला अचानक लागलेल्या आगीचा थरार अनुभवला. मात्र या गंभीर घटनेमुळे शहरवासीयांमध्ये तासाभरासाठी घबराटीचे वातावरण पसरले होते. उरण-करंजा नौदलाच्या शस्त्रागाराच्या डेपोमध्ये युपीएसच्या वापरासाठी उपयोगात येणाऱ्या १२० बॅटऱ्या घेऊन पुण्याहून आयशर मिनी ट्रक निघाला होता. सकाळी उरण शहरातील राजपाल नाक्यावर आल्यानंतर नागरिकांना गाडीत मागच्या बाजूला आग लागल्याचे दिसून आले. सुज्ञ नागरिकांनी गाडीत काहीतरी जळत असल्याची बाब वाहनचालक संतोष सिताराम पन्हाळकर (२९) रा. पुणे यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र आगीची बाब निदर्शनास येईपर्यंत एव्हाना गाडीत असलेल्या १२० बॅटऱ्यांनी पेट घेतला होता. त्यामुळे मीनी आयशर ट्रकला आगीने वेढले होते.
वाहनचालक संतोष पन्हाळकर यांनी प्रसंगावधान राखून आणि धाडसाने भर बाजारात पेटलेला ट्रक भरधाव वेगाने चालवत अर्धा किमी अंतरावर सुरक्षित आणि वर्दळ नसलेल्या ठिकाणी आणून ठेवला आणि वाहनातून उडी घेऊन सुरक्षितरित्या उतरला. एव्हाना तासाभराच्या पेटत्या मीनी ट्रकच्या थराराची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली होती.माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आयशर मिनी ट्रकला लागलेली आग लागलीच आटोक्यात आणली.यामध्ये मीनी ट्रक आणि त्यामधील नौदलाच्या शस्त्रागार डेपोमध्ये नेण्यात येणाऱ्या १२० बॅटऱ्याही जळून खाक झाल्या आहेत.या घटनेत मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे एपीआय गणेश शिंदे यांनी माहिती देताना सांगितले.नुकसानीचा आकडाही याक्षणी सांगणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान उरण शहरातील गजबजलेल्या भर बाजारपेठेतून मंगळवारी (२५) सकाळी ९ च्या सुमारास आगीने वेढलेल्या मीनी ट्रकचा थरार शेकडो नागरिकांनी अनुभवला. यावेळी रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र नागरिक व वाहन चालकाच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला आहे.