नवी मुंबई - दुसऱ्या मजल्यावरील घरात लाद्या बसवण्याचे काम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना वाशी सेक्टर २९ येथील सुदामा सोसायटीत शुक्रवारी दुपारी घडली. यामध्ये पहिल्या मजल्यावरील कुटुंब थोडक्यात बचावले. छताचे प्लास्टर कोसळत असताना लाद्या बसवण्यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्यांचा भार पडल्याने ही दुर्घटना घडली.
इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या जी. पी. कांची यांच्या घरात डागडुजीचे काम सुरू होते. ही इमारत मोडकळीस आली असून, अनेक ठिकाणी छताचे प्लास्टर कोसळून आतील सळया बाहेर आल्या आहेत. अशा अवस्थेत दुसऱ्या मजल्यावर दुरुस्ती काम हाती घेऊन लाद्या बसवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रीज, वाळू गोणीत भरून ठेवण्यात आले होते. यादरम्यान फ्लोअरिंगवर लादी बसवताना, तसेच इतर कामाच्या हादऱ्यामुळे स्लॅब कोसळला. यावेळी पहिल्या मजल्यावरील रुमा विश्वास यांच्या घरातील व्यक्ती बाहेर होत्या. त्यामुळे कोणाला दुखापत झाली नाही. मात्र, दुर्घटनेमुळे दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या वाशी अग्निशमन दलासह महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, शिरीष आरदवाड, उपयुक्त चंद्रकांत तायडे, उपायुक्त सोमनाथ पोटरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. इमारतीमध्ये सुरू असलेल्या दुरुस्ती कामाला परवानगी देण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.