अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांचाच अपघात भरधाव कारने दिली धडक
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 24, 2023 01:11 PM2023-09-24T13:11:45+5:302023-09-24T13:12:19+5:30
पामबीच मार्गावरील मध्यरात्रीची घटना
नवी मुंबई: पामबीच मार्गावर अपघात झालेल्या दुचाकीस्वारांना मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसालाच भरधाव कारने धडक दिल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. यामध्ये एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस व्हॅनचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अपघात करणाऱ्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पामबीच मार्गावर वाशीकडे येणाऱ्या लेनवर टी.एस. चाणक्य पासून काही अंतरावर हा अपघात घडला आहे. रात्री दिडच्या सुमारास पामबीच मार्गावर वाहतूक शाखा पोलीसांची गस्त सुरु होती. यावेळी पहिल्या लेनवर दुचाकीचा अपघात झाला असून दोघे जखमी अवस्थेत असल्याचे गस्तीवरील वाहतूक पोलिसांच्या निदर्शनात आले. पहिल्या लेनवर अपघातग्रस्त मोटरसायकल व जखमी तरुण असल्याने इतर वाहनाची त्यांना धडक बसण्याची शक्यता होती. यामुळे गस्ती वाहन थांबवून पोलिस शिपाई नितीन पाबळेव आप्पासाहेब पाटील हे जखमी तरुणांना मदत करून रस्त्याच्या कडेला घेऊन येत होते.
यावेळी सीबीडीकडून वाशीकडे जाणाऱ्या भरधाव कारने रस्त्यालगत उभ्या पोलिस व्हॅनला व अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांनाही धडक दिली. त्यामध्ये नितीन पाबळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गाडीच्या नंबरवरून कार चालक सार्थक मेहता (22) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो नेरूळचा राहणारा असून पामबीच मार्गाने भरधाव वेगात जात असताना रस्त्यावर पोलिसांना बघताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे त्याची कार रस्त्यालगत उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनला धडकून पोलिसांनाही धडक दिली. मात्र अपघातानंतर त्याने त्याठिकाणावरून पळ काढला होता.