पंतप्रधानांच्या सभेचे नक्की स्थळ ठरेना! कार्यक्रम स्थळावरून अधिकाऱ्यात संभ्रम

By कमलाकर कांबळे | Published: October 10, 2023 10:04 PM2023-10-10T22:04:23+5:302023-10-10T22:08:43+5:30

PM मोदी यांचा नियोजित कार्यक्रम कुठे होणार याबाबत अधिकाऱ्यांत संभ्रम असल्याने सिडकोसमोर पेच

The venue of the Prime Minister meeting has not been determined Confusion among officials from the venue | पंतप्रधानांच्या सभेचे नक्की स्थळ ठरेना! कार्यक्रम स्थळावरून अधिकाऱ्यात संभ्रम

पंतप्रधानांच्या सभेचे नक्की स्थळ ठरेना! कार्यक्रम स्थळावरून अधिकाऱ्यात संभ्रम

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राज्य सरकाने नवी मुंबईत नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदान निश्चित केले होते. त्या अनुषंगाने प्राथमिक कार्यवाहीसुद्धा सुरू केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी सेंट्रल पार्क मैदानाची पाहणी केली. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेसह इतर काही ठिकाणांचीही या पथकाने पाहणी केल्याचे समजते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित कार्यक्रम कुठे होणार याबाबत अधिकार्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील नियोजित दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा मागील दहा बारा दिवसांपासून कामाला लागल्या आहेत. या सोहळ्याची तारीख अद्यापी निश्चित झाली नसली तरी हा कार्यक्रम खारघर येथील सिडकोच्या सेंट्रल मैदानावर होईल, असे सुरुवातीपासून बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून चर्चा केली होती. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्याची सिडकोची योजना आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सोमवारी मुंबईत बैठक घेवून या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील पथकाने मंगळवारी नवी मुंबईत येवून नियोजित कार्यक्रमाच्या स्थळांची व तयारीची पाहणी केली. त्यानंतर या पथकाने संबधित अधिकाऱ्यांबरोबर सिडकोच्या बेलापूर येथील गेस्ट हाऊसमध्ये बैठक घेऊन चर्चा केली. दरम्यान, सेंट्रल पार्कऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

कार्यक्रमाची तारीखही अनिश्चित

या नियोजित कार्यक्रमाच्या तारखेवरूनसुद्धा अद्यापी संभ्रम आहे. कारण पंतप्रधान कार्यालयाकडून या कार्यक्रमाविषयीचा कोणताही कार्यक्रम आयोजकांना प्राप्त झालेला नाही. असे असले तरी १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान कोणत्याही एका तारखेला हा कार्यक्रम होईल, अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र ही शक्यता सुद्धा धूसर आहे. त्यासाठी २१ ऑक्टोबर किंवा दसऱ्याचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता सूत्रानी व्यक्त केली.

Web Title: The venue of the Prime Minister meeting has not been determined Confusion among officials from the venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.