नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे रखडलेल्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाला आता तरी मुहूर्त मिळेल, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.
विशेषतः शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू, खारकोपर-उरण रेल्वे आणि दिघा रेल्वेस्थानकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर नवी मुंबईकरांना आता काही प्रकल्पांच्या उद्घाटनाचे वेध लागले आहेत. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे हक्क आणि त्यांच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी सिडकोने उलवे येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून भूमिपुत्र भवन बांधले आहे.
मागील दोन वर्षांपासून तयार असलेल्या या प्रकल्पाचे आचारसंहिता लागू होण्याअगोदर उद्घाटन होईल, असे आडाखे बांधले जात आहेत. मुंबई ते नवी मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने नेरूळ येथे १११ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या जेट्टीच्या उद्घाटनाची नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असून, त्यादृष्टीनेसुद्धा सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे.
घरांच्या सोडतीला मिळणार मुहूर्त?सिडकोच्या माध्यमातून मागील वर्षभरात सिडकोने घरांची एकही योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे नवीन सोडतीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. पुढील चार वर्षांत सिडको ६७ हजार घरांची उभारणी करणार आहे. सध्या पंचवीस हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. मात्र मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी सल्लागार संस्थेच्या नियुक्तीनंतर निर्माण झालेल्या वादामुळे सिडकोला मागील वर्षभरात घरांची एकही नवीन योजना जाहीर करता आलेली नाही. प्रजासत्ताकदिनी अर्थात २६ जानेवारीला सिडकोकडून घरांची सोडत काढली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच होणार उद्घाटन ही सेवा चालविण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या होत्या. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने हा प्रकल्पसुद्धा फेब्रुवारीपूर्वी कार्यान्वित होईल, अशी शक्यता आहे. सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा आणि तुर्भेदरम्यानची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तुर्भे येथे उड्डाणपूल बांधला आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने उद्घाटनापूर्वीच तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. आचारसंहिता लागू होण्याअगोदर त्या उड्डाणपुलाचे औपचारिक उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे.
दक्षिण नवी मुंबईत अनेक प्रकल्पया शिवाय सिडकोच्या माध्यमातून दक्षिण नवी मुंबईत अनेक लहान-मोठे विकास प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. त्यांचेही लवकरच लोकार्पण होण्याची शक्यता आहे.