लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई, खारघर, कामोठे परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरील मुख्य जलवाहिनी आदई गावाजवळ फुटली आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले असून दुरूस्तीला जवळपास १४ तास लागणार असल्यामुळे सायंकाळी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम ७ जूनला करण्यात आले होते. यामुळे एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. शुक्रवारपासून पाणी पुरवठा पुर्ववत झाला असताना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आदई गावाजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करून तत्काळ दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता संजय देसाई व अभियांत्रीकी विभागाच्या पथकाने तत्काळ दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
२०२४ मि. मि. व्यासाची जलवाहिनी फुटली असल्यामुळे दुरूस्तीसाठी वेळ लागणार आहे. जवळपास १४ तास दुरूस्तीचे काम सुरू राहणार आहे. रात्री १२ ते १ वाजता काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई, खारघर व कामोठे परिसरामध्ये सायंकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
आदईजवळ जलवाहिनी फुटली असून तत्काळ दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. जवळपास १४ तास दुरूस्तीचे काम सुरू राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा .- संजय देसाई, शहर अभियंता महानगरपालिका