डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई; माॅल्स, जीमखान्यात बरसले रंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:26 AM2024-03-26T11:26:27+5:302024-03-26T11:26:40+5:30
या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुण, तरुणींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
नवी मुंबई : शहरात धूलिवंदन जल्लोषात साजरे करण्यात आले. शहरातील मॉल्स, जीमखाने, पनवेल परिसरातील फार्महाउसमध्ये तरुणाईने जल्लोष केला. गृहनिर्माण सोसायटींसह अनेक ठिकाणी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. शहरातील सर्व रस्तेही रंगाने न्हाऊन निघाले होते. धूलिवंदनाचा जल्लोष करण्यासाठी जीमखान्यांसह अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुण, तरुणींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
सोसायट्यांमध्येही आयोजन
डीजे व इतर वाद्यांच्या तालामध्ये नृत्याचा फेर धरत रंगांची उधळण सुरू असल्याचे चित्र सर्व ठिकाणी पाहावयास मिळाले. सर्व गृहनिर्माण साेसायट्यांमध्येही रंगोत्सवाचे आयोजन केले होते. पहाटेपासून रोडवरही दिसेल त्याच्यावर रंग उधळला जात होता.
नैसर्गिक रंगांचा वापर वाढला
या वर्षी नैसर्गिक रंगांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचे पाहावयास मिळाले. काही प्रमाणात केमिकलमिश्रित रंगांचाही वापर केला जात होता.
बंदी असूनही शहरात रंग उधळण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, फुग्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला.
धूलिवंदन दिवशी मद्यपान करून रस्त्यावर अनेकांनी धिंगाणा घालण्यास सुरुवात केली होती. अशा टपोरींवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली होती. अनेकांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.