नवी मुंबई : पनवेल मधील कोळखे येथील सलासर ऑटो क्राफ्ट स्टाॅकयार्ड गोडाऊनमध्ये महेंद्रा कंपनीच्या ७०० कार उभ्या केल्या आहेत. वाहनांच्या सुरक्षेसाठी गोडाऊनच्या सभोवती ७ फुटांचे कुंपन तयार केले असूनही चोरट्यांनी दोन कारच्या काचा फोडून आतमधील ३ लाख २४ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.
मोकळ्या जागेवर तयार केलेल्या गोडाऊनला चारही बाजूला कुंपन तयार केले आहे. मागील सहा महिन्यांपासून येथे महेंद्रा कंपनीच्या कार उभ्या केल्या आहेत. मंगळवारी रात्री गोडाऊनचे प्रवेशद्वार बंद करून कर्मचारी घरी गेले होते. बुधवारी एक कार वितरणासाठी घेऊन जात असताना मागील काच फुटली असल्याचे निदर्शनास आले. गोडाऊनमध्ये चोरी झाल्याची शंका आल्याने सर्व कारची पाहणी केली असता दोन कारच्या काचा फोडल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी कारमधील स्टेरिंग असेंम्ब्ली, ओआरव्हीएम ॲसेंम्बली, वायरींग हरनेस, सिलव्हर बॉक्स, इन्फोटेन्मेंट सिस्टीम, लॉकसेट अशा एकूण १२ पार्टची चोरी केली असून त्याची किंमत ३ लाख २४ हजार आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.