जैन मंदिरामध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:50 PM2018-11-28T23:50:52+5:302018-11-28T23:51:11+5:30
तुर्भेतील प्रकार : दानपेट्याही फोडल्या; टीव्हीही नेला; तीन मुकुट पळविले
नवी मुंबई : तुर्भे सेक्टर २२ मधील जैन मंदिरामध्ये मंगळवारी रात्री चोरी झाली. चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून तीन देवांचे मुकुट, दानपेट्यांतील व कपाटातील रोख रक्कम, टीव्ही संचासह २ लाख १५ हजारांचे साहित्य चोरून नेले आहे.
राजस्थान जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघाचे तुर्भे गावामध्ये मंदिर आहे. सकाळी साडेपाच वाजता मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते व रात्री ८ वाजता बंद केले जाते. बुधवारी सकाळी पुजारी रामलाल रावल मंदिर उघडण्यासाठी गेले असता त्यांना मंदिराचे गेट तुटले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मंदिर समितीच्या संचालकांना बोलावून घेतले. मंदिराच्या तळमजल्यावरील दरवाजाचे कुलूप तुटले होते. हॉलमधील लोखंडी कपाटातील ६० हजार रूपये गायब असल्याचे निदर्शनास आले. पहिल्या मजल्यावरील लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमधील दोन लोखंडी व एक लाकडी दान पेट्यांचे कुलूप तोडून आतमधील ५० हजार रूपये चोरून नेले आहेत. मंदिरामधील शंकेश्वर, मुनीवर स्वामी, धरमनाथ देवाच्या डोक्यावरील पंचधातूंचे मुकूट काढून नेले आहेत.
चोरट्यांनी सीसीटीव्ही पाहण्यासाठी बसविलेली टीव्हीही चोरून नेली आहे. तब्बल २ लाख १५ हजार रूपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी वाशी व पनवेलमध्येही जैन मंदिरामध्ये चोरी झाली होती. यामुळे मंदिरामध्ये चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुर्भेमधील घटनेविषयी मंदिराचे विश्वस्त केवलचंद्र पुनमिया यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये याविषयी माहिती दिली आहे. विश्वस्तांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.