- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोकडून नवी मुंबईतील विविध नोडमध्ये ९० हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. यातील काही घरे पूर्ण होत आली आहेत. याचाच गैरफायदा घेत काहींनी सिडकोच्या नावाने ग्राहकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. हा ग्राहकांच्या डेटा चोरीचा प्रकार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे अशा सर्वेक्षणापासून सावध राहावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.
या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सिडकोचे नाव वापरून बिल्डर मंडळी कोणत्या ग्राहकास कोणत्या आकाराची सदनिका हवी आहे, ती कोणत्या नोडमध्ये हवी आहे, याची माहिती भरून घेतात. केवळ ग्राहकांचा डेटाच नव्हे तर सिडकोचे संभाव्य ग्राहकही पळविण्याचा काही बिल्डरांचाच प्रयत्न असल्याचा प्रकार असावा, असे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत सिडकोकडून थेट प्रतिक्रिया मिळत नसल्याने ग्राहकही संभ्रमात आहेत. यामुळे सिडकोच्या नावे जी लिंक व्हायरल करण्यात येत आहे, ती ओपन करू नये. केल्यास माहिती भरून सबमिट करू नये, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. कारण या माध्यमातून तुमच्याविषयीची सर्व माहिती, तुमचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, तुम्हाला कोणत्या आकाराची सदनिका हवी आहे, कोणत्या नोडमध्ये हवी आहे, ही सर्व माहिती संबंधितास आपसूक मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. यामुळे यावर सिडकोने ठोस भूमिका घ्यायला हवी, अशी मागणी होत आहे.
काय आहे त्या लिंकमध्ये?सिडकोच्या प्रधानमंत्री महागृहनिर्माण योजना या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अंमलबजावणी आणि व्यवस्थापनासाठी योजना पात्र खरेदीदारांना १ बीएचके आणि २ बीएचके घरांसाठी ६७,००० युनिट्स प्रदान करणार आहे. नवी मुंबईतील वाशी, तळोजा, खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, जुईनगर, मानसरोवर, खांदेश्वर, बामणडोंगरी आणि खारकोपर अशा विविध महत्त्वाच्या ठिकाणी ही घरे आहेत. आम्ही इच्छुक खरेदीदारांसाठी सखोल सर्वेक्षण करत आहोत. नवी मुंबईतील सिडकोच्या प्रधानमंत्री महागृहनिर्माण योजना प्रकल्पात ज्या खरेदीदारांना घर खरेदी करण्याची इच्छा आहे, कृपया त्यांनी खालील लिंक वापरून सर्वेक्षण भरा, असे आवाहन त्यात केले आहे.
‘सिडकोकडून सर्वेक्षण नाही’ पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सिडकोने असे कोणतेही सर्वेक्षण सुरू केलेले नाही, असे सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी स्पष्ट केले.