चोरी करणाऱ्या दुकलीला अटक
By admin | Published: April 24, 2017 02:37 AM2017-04-24T02:37:55+5:302017-04-24T02:37:55+5:30
बंद कंपनीत चोरी करणाऱ्या दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही महापे गावचे राहणारे असून त्यांच्याकडून
नवी मुंबई : बंद कंपनीत चोरी करणाऱ्या दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही महापे गावचे राहणारे असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी बँकेने सील ठोकल्याने बंद असलेल्या कंपनीच्या मागच्या बाजूचे शटर तोडून त्याठिकाणी चोरी केली
होती.
व्यंकटेश नाडर (१९) व आकाश चव्हाण (२०) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी पाच महिन्यांपूर्वी महापे येथील ई इन्फोटेक इंडिया कंपनीत चोरी केली होती. आर्थिक प्रकरणातून बँकेने या कंपनीला सील ठोकल्याने ही कंपनी बंद होती. याचा गैरफायदा घेत नाडर व चव्हाण यांनी कंपनीच्या मागच्या बाजूचे शटर तोडून आत प्रवेश
केला होता. त्यानंतर कंपनीतले ९ एलसीडी मॉनिटर व १ प्रिंटर चोरी करून नेला होता. मात्र कंपनी बंद असल्याने अद्यापपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होवू शकलेला
नव्हता.
काही दिवसांपूर्वी एक जण चोरीचे मॉनिटर विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उल्हास कदम, हवालदार दिगंबर झांजे, सागर रसाळ, सोमनाथ वने, पोलीस नाईक युवराज राऊत, सूरज जाधव, योगेश ठाकूर व
स्वप्निल अहिरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी सापळा लावून एकाला ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी ई इन्फोटेक इंडिया या बंद कंपनीतून १३ मॉनिटर व १ प्रिंटर चोरल्याची कबुली दिली. त्यापैकी ९ मॉनिटर जप्त करण्यात आले असून उर्वरित मॉनिटर त्यांनी कोणाला विकले याचा अधिक तपास सुरू असल्याचे उल्हास कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)