नवी मुंबई : मुंबईत डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी तुर्भे क्षेपणभूमीला भेट दिली. या ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र व्यवस्थित सुरू नाही. प्लास्टिक कचऱ्यामुळे देवनारची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली आहे. महापालिकेच्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडवरील सुरक्षा व इतर कामाचा आढावा घेण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केले होते. येथील लिचेट ट्रीटमेंट प्लँटमध्ये गाळ साचला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारी काही यंत्रसामुग्री बंद पडली आहे. क्षेपणभूमीवर येणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण वाढत आहे. शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदीची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. प्लास्टिकचा कचरा कमी झाला नाही तर भविष्यात देवनारप्रमाणे येथेही आग लागून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, असे विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. क्षेपणभूमीवर किती गाड्या येतात, त्यामधून येणारा कचरा, डेब्रीजवर कॅमेऱ्याचे लक्ष असले पाहिजे. सदर ठिकाणी कर्मचारी कमी असल्याचेही निदर्शनास आले आहे. लिचेट ट्रीटमेंट प्लँटमधील गाळ, डासांचे वाढते प्रमाण याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, राजू शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
....तर देवनारची पुनरावृत्ती होईल
By admin | Published: February 02, 2016 2:10 AM