तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता; २४० महिलांचा समावेश, कौटुंबिक वादासह अज्ञात कारणे
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 7, 2023 04:54 PM2023-04-07T16:54:20+5:302023-04-07T16:54:36+5:30
कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत.
नवी मुंबई : कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत. तीन महिन्यात अशा ४१३ व्यक्ती बेपत्ता झाल्या असून त्यापैकी मोजक्या व्यक्तींचा शोध लागलेला आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये २४० महिलांचा समावेश आहे.
वेगवेळ्या कारणांनी कौटुंबिक कलह वाढत आहेत. त्यातून महिलांवर मानसिक ताण येत आहे. तर नोकरी व्यवसायातील अपयशातून तसेच इतर कारणांनी तरुण, पुरुष घर सोडून जात असतात. अनेकदा घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी न आल्याने देखील ते हरवल्याची तक्रार पोलिसांकडे केली जाते. नवी मुंबईपोलिस आयुक्तालय क्षेत्रात अशा विविध कारणांनी मागील तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. त्यात काही महिला त्यांच्या लहान मुलांसह देखील बेपत्ता झाल्या आहेत. याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे प्राप्त होताच त्यांच्या शोधासाठी प्रयत्न केले जातात.
मात्र शोध घेऊनही माहिती न मिळाल्यास पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवला जातो. प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अशा व्यक्ती नवी मुंबईसह पनवेलमधून बेपत्ता होत असतात. त्यात महिलांचे प्रमाणही गंभीर असून मागील तीन महिन्यात देखील २४० महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी काही व्यक्तींचा पोलिसांची शोध घेतला असून काही व्यक्ती काही दिवसांनी स्वतः घरची वाट धरतात. मात्र उर्वरित व्यक्ती नेमकं जातात कुठे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.