अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीकळंबोली वसाहतीत साडेतीन प्रभागांचा समावेश होत आहे. त्यामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार मतदार आहेत. प्रभाग क्र मांक दहामध्ये वीस हजारांपेक्षा जास्त मतदान आहे. एकूण चौदा नगरसेवक ही वसाहत निवडून देणार आहे. त्यामुळे कळंबोलीकरांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षसुद्धा कामाला लागले आहेत.दक्षिण नवी मुंबईतील कळंबोली सर्वात जुनी वसाहत आहे. माथाडी कामगारांची वसाहत म्हणून कळंबोली परिचित होती. गेल्या काही वर्षांत सर्व सेक्टर विकसित झाल्याने वसाहतीचा विस्तार वाढला आहे. त्याचबरोबर लोकवस्तीतही भर पडलेली आहे. विशेष करून रोडपाली परिसरात साडेबारा टक्के योजनेंर्तगत देण्यात आलेल्या भूखंडावर इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. खारघरच्या धर्तीवर रोडपाली पट्ट्याचा विकास सिडकोने केला आहे. टोलेजंग इमारतींबरोबरच प्रशस्त इमारती हे येथील वैशिष्ट्य मानले जाते. प्रभाग क्र मांक-७मध्ये रोडपाली गाव आणि नव्याने विकसित झालेल्या सेक्टरचा समावेश होतो. नवीन भाग असल्याने येथे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ लागलेली आहे; परंतु या परिसरात पायाभूत सुविधांचा वानवा असल्याने येथील नागरिक कमालीचे नाराज आहेत. सिडकोने फक्त मोठे रस्ते तयार करून ठेवले असले तरी क्रीडांगण, उद्यान, विरंगुळा केंद्र विकसित केले नाहीत. याशिवाय कोणत्याही प्रकारचे मार्केट या भागात नाही त्यामुळे रहिवाशांना थेट कळंबोली वसाहत गाठावी लागते. तळोजा एमआयडीसीतून रसायनमिश्रित सांडपाणी रोडपाली खाडीत सोडले जाते. तसेच रात्रीच्या वेळी कारखाने विषारी वायू हवेत सोडत असल्याने त्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे. याबाबत राजकीय पक्षांकडून फारसा आवाज उठविण्यात आला नसला तरी सिडको, एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळा विरोधात येथील अनेक रहिवाशांनी एकत्र येऊन एकता सामाजिक सेवा संस्थेच्यामाध्यमातून लढा उभारला. या मंडळींनी प्रदूषणाची थेट पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली. त्याची दखलसुद्धा घेण्यात आली त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ जागे झाले. एकता सामाजिक सेवा संस्थेने होल्डिंग पाँडच्या बाजूला असलेली मोकळी जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी ज्येष्ठांकरिता तात्पुरत्या स्वरूपाचे विरंगुळा केंद्र आणि वाचनालय बांधले होते, त्याबाबतही कोणी तरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन सिडकोकडे तक्रार केली. सिडकोने त्यावर हातोडा मारल्याने येथे जनप्रक्षोप वाढला आहे. या प्रभागात सतरा हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत.प्रभाग क्र मांक-८मध्ये विशेष करून सिडकोच्या घरांचा समावेश होते. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीचा मुख्य प्रश्न या प्रभागात आहे. सोळा हजारांच्या घरात येथे मतदान आहे. प्रभाग क्र मांक १०सुद्धा कळंबोली वसाहतीत आहे. या प्रभागातही सिडको इमारती आहेत त्यांचेही अनेक प्रश्न आहेत. या प्रभागातील मतदारांनी वीस हजारांचा आकडा पार केला आहे.
कळंबोलीत पंचेचाळीस हजार मतदार
By admin | Published: May 01, 2017 6:46 AM