जखमा बांधण्यासाठी मलमपट्ट्याही नाहीत, मेडिकलमधील साहित्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:03 AM2018-04-12T03:03:47+5:302018-04-12T03:03:47+5:30
महापालिका रुग्णालयामध्ये औषधे व अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा कायम आहे. मंगळवारी रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलमधून हातमोजे व जखमा बांधण्यासाठी बँडेज आणण्याची सक्ती केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
नवी मुंबई : महापालिका रुग्णालयामध्ये औषधे व अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा कायम आहे. मंगळवारी रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलमधून हातमोजे व जखमा बांधण्यासाठी बँडेज आणण्याची सक्ती केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
इंदिरानगर परिसरातील दोन रुग्णांना मंगळवारी उपचारासाठी महापालिका रुग्णालयात नेण्यात आले होते. दोघांच्याही डोक्याला जखमा झाल्या होत्या. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णांच्या जखमा पुसण्यासाठी व मलमपट्टी करण्यासाठीचे साहित्यही नसल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी तत्काळ हातमोजे व बँडेजचे साहित्य मेडिकलमधून विकत आणण्यास सांगितले. रुग्णांच्या नातेवाइकांना जवळपास ७०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. रुग्णालयामध्ये साहित्य नसल्याने बाहेरून आणण्याची सक्ती करण्यात आली. नातेवाइकांनी मेडिकलमधून पक्के बिल मागितले. बिल घेतले असल्याचे लक्षात येताच, पालिका कर्मचाऱ्यांनी बिल मागून घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही महापालिका रुग्णालयात जखमींना मेडिकलमध्ये जाऊन हातमोजे विकत आणण्यास भाग पाडले होते. पुन्हा तोच प्रकार घडल्यामुळे रुग्ण व नातेवाइकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
>महापालिका रुग्णालयात गरीब रुग्णांची लूट केली जात आहे. रुग्णालयात साहित्याची कमतरता आहे. मेडिकलचालकाच्या फायद्यासाठीही रुग्णांना मेडिकलमधून साहित्य आणण्याची सक्ती केली जात असून, याविषयी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे.
- महेश कोठीवाले,
शाखाप्रमुख,
शिवसेना