कोरोनाविषयी शासनासह मनपाच्या आकड्यांमध्ये दिसते आहे तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:52 PM2020-08-27T23:52:31+5:302020-08-27T23:53:04+5:30
लोकप्रतिनिधींची तक्रार : आकडेवारीविषयी संभ्रम दूर करण्याची मागणी
नवी मुंबई : कोरोनाविषयी महानगरपालिका व शासनाच्या आकडेवारीमध्ये फरक असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून आकड्यांचा घोळ मिटवावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रतिदिन कोरोनाविषयी दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करीत असते. यामध्ये रोज वाढलेले रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा याविषयी तपशील दिला जातो. जिल्हा अधिकारी कार्यालयाकडूनही नियमित अहवाल प्रसिद्ध केला जातो. याशिवाय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रतिदिन राज्यातील आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. महानगरपालिका देत असलेले आकडे व शासनाकडील अहवाल यामध्ये तफावत येऊ लागली आहे. माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र देऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.
बुधवारी मनपाने २८७ रुग्ण वाढल्याचे त्यांच्या अहवाल नमूद केले होते. परंतु शासनाच्या अहवालात ५१९ रुग्ण वाढल्याचे नमूद केले होते. शासनाने एकूण रुग्णसंख्या २६,७४९ दिली असून, मनपाने हा आकडा २४,२१४ दिला आहे. दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू झालेल्यांचा आकडा ६०२ असल्याचे शासनाच्या अहवालात नमूद केले आहे. मनपाने मात्र ६ जणांचा मृत्यू झाल्याचे व एकूण मृतांचा आकडा ५५७ असल्याचे नमूद केले आहे. महानगरपालिका व शासनाकडील आकडेवारीमधील फरकामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नक्की कोणाची आकडेवारी खरी असा प्रश्न निर्माण होत आहे. आकडेवारीमधील घोळ लवकरात लवकर दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिका व शासनाकडील आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. मनपाच्या अहवालापेक्षा शासनाकडील अहवालात रुग्णसंख्या व मृतांचा आकडा जास्त असल्याचे निदर्शनास आले असून हा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे. - वैभव गायकवाड, माजी नगरसेवक