लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळ्यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १५ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांची आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पाहणी केली. सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी व सुरक्षेसाठी नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांनाही पावसाळ्यापूर्वी कामे वेळेत करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरातील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, १५ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली.
मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई एमआयडीसीमधील रमेश मेटल कॉरी परिसराची पाहणी केली. येथील नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे. इतर ठिकाणीही पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही केल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात असलेल्या झोपड्या हटविण्याच्या सूचनाही केल्या आहेत. नैसर्गिक नालेसफाई, बंदिस्त गटारे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या सफाई कामांचीही प्रत्यक्षात पाहणी केली. शहरात पाणी तुंबणार नाही, नैसर्गिक नाल्यामध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. या पाहणी दौऱ्याच्या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.