संवादापेक्षा वादविवादच जास्त, नवी मुंबईत महायुतीत धुसफुस; उमेदवार अनिश्चिततेमुळेही अस्वस्थता
By नामदेव मोरे | Published: March 23, 2024 05:29 AM2024-03-23T05:29:08+5:302024-03-23T05:30:27+5:30
नवी मुंबईतील बड्या नेत्यांसमोर मनोमिलनाचे आव्हान
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईत महायुतीमधील शिवसेना व भाजपच्या नेत्यांमधील संवाद जवळपास ठप्प झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन व मोडकळीस आलेल्या इमारत पुनर्बांधणीच्या मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका केली जात आहे. उमेदवाराच्या अनिश्चिततेमुळेही इच्छुकांमध्ये अस्वस्थता असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन करण्याचे आव्हान पक्षाच्या नेत्यांसमोर उभे आहे. महायुतीमध्ये उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गट व भाजप दोन्हीमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे.
शिवसेनेला हा मतदारसंघ सुटणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, धुळवडीला मुख्यमंत्री कोणाला उमेदवारीचा रंग लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबईमध्ये बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व शिवसेना नेते-पदाधिकारी यांच्यामध्ये संवाद असला तरी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधून विस्तव जात नाही.
मागील काही महिन्यांत झोपडपट्टी पुनर्वसन, जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, यादवनगर येथील
शाळेचे लोकार्पण या मुद्द्यांवरून नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद पाहावयास मिळाले आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चाैगुले व इतर पदाधिकाऱ्यांनी नाईक यांच्यावर आक्षेप घेऊन युतीचा धर्म फक्त आम्हीच पाळायचा का, असा प्रश्न उपस्थित केला होता. नाईक यांच्या वतीने महापालिकेचे माजी सभागृह नेते अनंत सुतार यांनी या टीकेला उत्तर दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
नवी मुंबईमधील आमदार गणेश नाईक व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद टोकाला गेले आहेत; पण या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. मतभेद अद्याप मिटविले नसले तरी जास्त वाढणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर नवी मुंबईतील ठप्प झालेला संवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा सुरू करणार, याकडे लक्ष लागले आहे.
८ लाख मतदार
नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ८ लाख १८ हजारपेक्षा जास्त मतदार आहेत. यामुळे निवडणुकीमध्ये येथील मते निर्णायक ठरणार आहेत.