पनवेल तालुक्यात एकही बोगस डॉक्टर नाही
By admin | Published: June 19, 2017 05:10 AM2017-06-19T05:10:38+5:302017-06-19T05:10:38+5:30
बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखणे हे त्यामागचे एक कारण आहे.
मयूर तांबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखणे हे त्यामागचे एक कारण आहे. पनवेल तालुक्यातही बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम राबविण्यात आली. आश्चर्य म्हणजे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना या मोहिमेत एकही बोगस डॉक्टर आढळला नाही. वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेत नवी मुंबई आणि पनवेल परिसरात शेकडोंच्या वर बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले होते आणि आता एकही बोगस डॉक्टर न आढळल्याने मोहिमेवरच संशय व्यक्त होत आहे.
तालुक्यात बोगस डॉक्टर शोधमोहीम शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली होती. जवळपास ३० दिवस ही मोहीम तालुक्यात राबविण्यात आली. मोहिमेमुळे बोगस डॉक्टरांचे नावे उघड करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, या शोधमोहिमेत पनवेल तालुक्यातील एकही बोगस डॉक्टर सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बोगस डॉक्टर शोधमोहीम शासकीय निकषांनुसार सुरू असून, या पथकाकडून ग्रामीण भागातील शेकडो डॉक्टरांची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तालुक्यात शेकडो बोगस डॉक्टरांनी बस्तान मांडले आहे, असे असतानादेखील मोहिमेत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना एकाही बोगस डॉक्टरावर कारवाई करता आलेली नाही. स्त्रीभृणहत्त्या रोखण्याचा एक भाग म्हणून बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई अधिक कठोर करणे आवश्यक आहे. मात्र, पनवेल तालुक्यातील ही मोहीम केवळ फार्सच ठरू लागली असल्याचे दिसत आहे. पनवेलमध्ये बोगस डॉक्टर काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, हे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे यांच्याशी संपर्क साधला असता, एकही बोगस डॉक्टर सापडला नसल्याची माहिती दिली.